मंगळवेढा : अभिजीत बने
शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेज येड्राव खवे ता. मंगळवेढा या प्रशालेचे प्राचार्य विश्वंभर दामोदर काळे व वसतीगृहाचे अधीक्षक मलकु महिबूब शेख यांच्या सेवानिवृत्ती निमित्त प्रशाला व ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दिनांक 24 मे रोजी सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक तथा ग्रामपंचायत येड्रावचे सरपंच संजय तुकाराम पाटील यांनी दिली.
शुक्रवार दिनांक 24 मे रोजी सकाळी 10 वाजता माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेज येड्राव खवे या प्रशालेच्या प्रांगणात हा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. संयोजकांनी सेवापूर्ती सन्मान सोहळ्याची अतिशय जय्यत तयारी केली असून या कार्यक्रमासाठी दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून त्यांच्या स्वागतासाठी येड्राव नगरी सज्ज झाली आहे.
प्रशालेचे प्राचार्य असलेले विश्वंभर काळे सर हे 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यांनी शाहू शिक्षण संस्थेच्या कोरवली, जामगाव, पडोळकरवाडी, येड्राव खवे या ठिकाणी ज्ञानदानाचे अविरत कार्य केले आहे. येड्राव सारख्या अतिशय छोट्या गावात स्वतःचे शेत संस्थेला दान करून शिक्षणाची गंगा आणली. येड्रावच्या ओसाड माळरानावर विद्येचा मळा फुलवला. विस्थापित, वंचित आणि गोरगरीब मजुरांच्या निरागस मुलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. भटक्या विमुक्तांची पोरं सुद्धा अगदी अभिमानाने शिक्षण घेऊ लागली. तालुक्यातील आश्रम शाळांपैकी सर्वात मोठी देखणी आणि उठावदार अशी इमारत विद्यार्थ्यांना खुणावू लागली. बघता बघता संपूर्ण मंगळवेढा तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून मुले शिक्षणासाठी या शाळेत दाखल होऊ लागली. ग्रामीण भागातील एक आदर्श शिक्षण संकुल म्हणून ही शाळा नावारूपाला आली. केवळ प्रा. लक्ष्मणराव ढोबळे सर आणि स्वर्गीय अनुराधा ढोबळे वहिनी यांचे पाठबळ आणि विश्वंभर काळे सरांची कर्तव्यनिष्ठा यामुळेच. काळे सर जरी आज शासकीय सेवेतून निवृत्त होत असले तरी या शाळेत शिक्षण घेत असलेल्या आणि या शाळेत शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि काळे सरांच्यामुळे ज्या गरिबांच्या घरात सुखाची नवी पहाट निर्माण झाली त्या प्रत्येकाच्या मनात काळे सरांचे नाव अजरामर कोरलेले आहे. त्यांच्या मनातून ते कधीच निवृत्त होणार नाहीत. या अतिशय शांत, संयमी, सुसंस्कृत, कार्यतत्पर, कर्तव्यनिष्ठ, वचनबद्ध, ज्याच्यासमोर आदराने मान झुकवावी अशा आदर्श व्यक्तिमत्वाला आजच्या सेवापूर्ती सत्कार समारंभासाठी न्यूज 87 लोकमन च्यावतीने मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.
हा सेवापूर्ती सन्मान सोहळा शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक, राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागासवर्गीय सेलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, उद्योगपती सुरेश येलपले-पाटील, शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, शाहू शिक्षण संस्थेचे सचिव व महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन ॲड.अभिजीत ढोबळे, पंढरपूरचे पोलीस निरीक्षक सौरभ शेटे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती भुजंगराव पाटील, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी उपसभापती काशिनाथ पाटील, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन जालिंदर माने, तसेच शाहू शिक्षण संस्थेतील सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत.
प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज, स्वर्गीय विठ्ठलराव नारायणराव येलपले पाटील ज्युनिअर कॉलेज सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, समस्त ग्रामस्थ येड्राव, काळे व शेख परिवार यांचेवतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यासाठी शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व परिसरातील ग्रामस्थ यांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक तथा सरपंच संजय तुकाराम पाटील, उपसरपंच संजय किसन पाटील, डॉ. विक्रम विश्वंभर काळे, ॲड. साहिल मलकू शेख यांनी केले आहे.









