टीम लोकमन मंगळवेढा |
महिला सहकाऱ्याची छेड काढणं पोलीस कर्मचार्यांना चांगलंच भोवलं आहे. पुणे येथे कर्तव्यासाठी जात असताना नागपूर ते पुणे प्रवासा दरम्यान मद्यप्राशन करून दारूच्या नशेत सहकारी महिला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याने नागपूर पोलीस आयुक्तांनी अखेर त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून सदर घटनेमुळे खाकी वर्दीला डाग लागल्याची मोठी चर्चा होत आहे.
पुणे जिल्ह्यात निवडणुकीच्या कर्तव्यासाठी नागपुरातून रेल्वेने काही पोलिसांना पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यावेळी प्रवासादरम्यान युवराज राठोड आणि आदित्य यादव या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी रेल्वेमध्ये मद्यप्राशन करत सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले होते. दरम्यान, या सर्व प्रकाराचे चित्रीकरण इतर सहकाऱ्यांनी आपल्या मोबाइल मध्ये कैद केले होते. कालांतराने हा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आणि त्यामुळे पोलीस प्रशासनासह शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ पोलीस आयुक्तांपर्यंतही पोहोचला होता. आयुक्तांनी या व्हिडिओच्या आधारावर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करत दोघांना नागपुरात परत बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस आयुक्तांकडून दोघांनाही निलंबित करण्यात आले.

नेमके प्रकरण काय?
नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी नागपूर पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटीसाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते. १० मे रोजी नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले युवराज राठोड आणि आदित्य यादव यांनाही कर्तव्यासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते.
दरम्यान रेल्वेने प्रवास करत असताना या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी रेल्वेत दारू प्यायली आणि दारू प्यायल्यानंतर दोघांनी रेल्वे डब्यातच गोंधळ घालायला सुरवात केली. यावेळी त्यांनी आपल्या एका सहकारी महिला पोलीस कॉन्स्टेबल सोबत दारूच्या नशेत गैरवर्तन करत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनीही महिला कर्मचाऱ्यांची छेड काढायला सुरुवात केली. दरम्यान सोबतच्या अन्य कर्मचान्यांनी त्यांना विरोध केला आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या नशेत अखंड बुडालेल्या या दोघांनीही सहकार्यांनाच शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली.
त्यावेळी इतर सहकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइल मध्ये कैद केला. त्यानंतर हा सर्व प्रकार इतरत्र व्हायरल झाला होता. तसेच रेल्वेत घडलेल्या या सर्व प्रकरणाची तक्रार पीडित महिलेने आपल्या वरिष्ठांकडे केली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी सोमवारी कठोर कारवाई करत दोघांनाही सेवेतून निलंबित केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातीलच पोलिसांनी केलेल्या प्रतापाची संपूर्ण राज्यभर मोठी चर्चा होत आहे.









