टीम लोकमन सोलापूर |
सोलापूर व माढा लोकसभा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतदार संघासाठी मंगळवार ०७ मे २०२४ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सुचनेनुसार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १६१७ मतदान केंद्रामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मतदारांच्या आरोग्याची काळजी घेणे व वाढत्या उन्हाची खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी दिली.
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि.७ मे २०२४ रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. शिवाय पुरेशा औषधाचे किटही केंद्रावर ठेवण्यात येणार असून त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अत्यावश्यक त्या प्राथमिक उपचारांसाठी औषध किट व व्हिलचेअर सुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पंचायत समित्यांचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांवर एक आशा वर्कर व पाच मतदान केंद्रापाठीमागे एक आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुरेशा औषध किटसह मतदानादिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे. मतदारांसह मतदान प्रक्रियेत राबणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे मतदान जास्त होण्यासाठी चांगली मदत होणार असल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले.












