सोलापूर : सुरज राऊत
काँग्रेसचे नेते राहुल गांधी बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील इंडियाआघाडी तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा आज बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मरीआई चौकातील एक्झिब्युशन ग्राउंड येथे दुपारी ३ वाजता होणार आहे.
प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू असून ‘सोलापूरची लेक’ म्हणून त्या जनतेसमोर जात आहेत. त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या जाहीर सभेची काँग्रेस पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोलापुरात तील उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सभेला आलेल्या नागरिकांसाठी पाच हजार छत्र्या, दहा हजार पांढरे गमजे देण्यात येणार आहेत. तसेच तीस हजार पाण्याच्या बाटल्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची क्रेज संपूर्ण देशात तयार झाली आहे. राहुल गांधी हे प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर येत असल्याने नागरिकांमध्ये ते काय बोलणार याची उत्सुकता आहे. ते भाजपच्या सरकारवर कसा हल्लाबोल करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.










