टीम लोकमन सोलापूर |
महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचा 63 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुका शाखांतून उत्साहाने साजरा करण्यात झाला. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना 22 जुलै 1962 रोजी पुणे या ठिकाणी झाली. मात्र त्या अगोदर छात्र शिक्षकांना स्टायफंड ऐवजी ड्युटी पे मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ट्रेनिंग स्कूलमधील हजारो छात्र शिक्षकांनी संघटित होऊन शासनाशी लढा दिला. पुढे याच शिक्षकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना केली. महाराष्ट्रातील महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली तर भा. वा. शिंपी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. विशेष महत्वाची बाब म्हणजे राज्याचे पहिले सरचिटणीस म्हणून सोलापूरचे वि. भा. येवले यांनी नेतृत्व केले.
मागील सहा दशकांहून अधिक काळ राज्यातील प्राथमिक शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांची सोडवणूक करीत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या संघटनेची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात देखील शिक्षक समितीचे मजबूत संघटन असून निष्ठावंत व त्यागी कार्यकर्त्यांच्या बळावर शिक्षक समितीने विश्वास संपादन केला आहे. शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील अनेक शाळांतून वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार, खाऊवाटप असे विविध उपक्रम राबवून शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
त्याचबरोबर ड्यूटी पे, जुनी पेन्शन, ग्रॅज्युएटी, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई व अन्य भत्ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू व्हावेत, वेतन आयोगाच्या माध्यमातून शिक्षकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी मागील सहा दशकांपासून शिक्षक समितीने केलेल्या कार्याला उजाळा मिळावा आणि नव्या पिढीपर्यंत कार्य पोहचविण्यासाठी माहिती पत्रके प्रसिद्ध केली आहेत.
त्याचबरोबर जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने लवकरच आपल्या शैक्षणिक सेवा काळात संघटनात्मक कार्य करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले अशा शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिक्षक समितीचा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर, कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे यांच्यासह जिल्हा व तालुका शाखांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आज या वर्धापन दिनी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.